सुनील ढगे
नागपूर : माओवादी-नक्षलवादी (Naxalites) यांचा विलय सप्ताह सुरू आहे. त्या अंतर्गत त्यांनी अग्निवीर आणि शेतकरी आंदोलनामध्ये (Andolan) सहभाग असल्याचं कबूल केलं. पत्रकामध्ये शहरी नक्षलवाद वाढवा आणि लोकांना सरकारच्या योजना विरोधात लढण्यास प्रवृत्त करा असं नमूद केलं आहे. अग्निवीर (Agniveer) सैन्य भरतीत कस भरती व्हायचं, याची देखील त्यांनी योजना तयार केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवाद्यांचा 18 वा वर्धापन दिन 21 ते 27 या कालावधीत साजरा करणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता शहरांमध्ये सक्रिय झालेला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नक्षलवाद आता शहरांमध्ये देखील पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माओवाद्यांनीच आपल्या पत्रामध्ये अग्निवीर आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं कबूल केलंय.
येणाऱ्या दिवसांमध्ये अधिकाधिक शहरांमध्ये आंदोलनांमध्ये सहभागी व्हा. सरकारच्या विरोधात लोकांना एकजूट करा, अशी सगळी रणनीती नक्षलवाद्यांनी आखली आहे. अशा आशयाचं पत्र नक्षल विरोधी विभागाच्या हाती लागलेलं आहे. त्यामध्ये त्यांची काय रणनीती आहे. पुढे काय योजना आहेत, या सगळ्यांची माहिती दिलेली आहे .
अग्निवीर भरतीवर सुद्धा नक्षलवाद्यांचा डोळा आहे. ते आपले लोक यात घुसविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमची यंत्रणा पूर्णपणे सक्रिय आहे. सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
शहरी भागातसुद्धा यंत्रणा सज्ज आहे. अग्निवीर भरतीवर सुद्धा आमची बारीक नजर असल्याचं नक्षलवाद विरोधी पथकाचे डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितलं.
आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या विरोधात काय करता येईल, याची रणनीती नक्षलवादी आखत आहेत. त्यामुळं नक्षलविरोधी पथकही सज्ज झालंय. या पत्रात नेमकं काय हे नक्षलविरोधी पथकालाचं माहीत आहे. त्यामुळं त्यानुसार ते कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.