नागपूर : पक्षशिस्त मोडल्यामुळे काँग्रेसने आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे देशमुख कोणत्या पक्षात जाणार? अशी चर्चा रंगली आहे. आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, आज आठ दिवस झाले तरी त्याबाबतच्या कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीये. अशावेळी आशिष देशमुख यांना एक मोठी ऑफर आली आहे. एका बड्या राजकीय पक्षाने देशमुख यांना थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा स्वीकारण्याची ऑफर केली आहे. आमच्याकडे आला तर या दोन्ही पदांपैकी कोणतंही पद घ्या, असं या पक्षाने देशमुख यांना म्हटलं आहे. त्यामुळे देशमुख ही ऑफर स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांनी थेट आशिष देशमुख यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पद किंवा राज्यसभा देण्याची ऑफर केसी राव यांनी दिली आहे. केसी राव यांनी देशमुख यांना भेटण्यासाठी बोलावलंही होतं. त्यामुळे देशमुख काल तेलंगणात गेले होते. काल दिवसभर ते केसी राव यांच्यासोबत होते. मला पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतल्याचं आशिष देशमुख यांनीच सांगितलं.
राव यांनी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा या दोन्ही पदाची ऑफर दिली आहे. पण मी अजून कोणताही विचार केलेला नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी आधी माझ्या वडिलांचा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेईन. त्यानंतरच पुढे काय करायचं याची दिशा ठरवेल, असं देशमुख म्हणाले.
भाजपचे नेते सुद्धा माझ्या घरी येऊन मला भेटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सुद्धा माझी भेट झाली. माझ्या परिवारातील संबंध असल्याने मी भेटत असतो किंवा ते मला भेटत असतात. मात्र अजून मी कुठलाही विचार केलेला नाही. योग्य वेळी विचार करणार आणि नंतर कळविणार, असं त्यांनी स्पष्ट केले.