चंद्रपूर : हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाला फसवण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले.
वकिलाच्या डोक्यावरून पाणी गेल्यावर त्यानं सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मागितली. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने तक्रार दाखल केली. समाज माध्यमांवर सक्रिय राहताना काळजी घेण्याचे पोलिसांनी आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील तरुण वकील समाज माध्यमांवर एका तरुणीच्या संपर्कात आला. आधी गप्पा आणि नंतर व्हाट्सअप चॅट होऊ लागले. तरुणीने सहज बोलाचालीचा हा सिलसिला पुढे व्हिडीओ कॉलिंगपर्यंत गेला आणि त्यात सर्व अश्लील हरकती सुरू झाल्या. त्यानंतर मुलीने रंग दाखवायला सुरुवात केली. व्हिडिओत स्वतः नग्न होत वकिलाला देखील गुंग करत नग्न करविले. या सर्व कृत्याचे रेकॉर्डिंग करत वकिलाची ब्लॅकमेलिंग सुरू केली. पैशांची मागणी सुरू झाली. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर सार्वत्रिक बदनामी करू, अशी धमकी वकिलास मिळू लागली. या धमकीमुळे हा वकील घाबरला आणि काही मित्रांना घडलेली गोष्ट सांगितली. त्यांनी त्यांना धीर देत पोलिसात जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता सूरज माडूरवार यांनी दिली.
शेवटी बदनामीची भीती मनातून काढत वकिलाने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा प्रकारांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन गोंडपिंपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी केले. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन आहे. तंत्र विकसित झाल्याने अनेक नकोशा गोष्टी सहज नजरेस पडत आहेत. अशातच या महाजाळातून मोहाच्या गोष्टी टाळण्यासाठीतरी परस्पर थेट संवादाची गरज व्यक्त केली जात आहे.