नागपूर : मनपा निवडणुकीत (Municipal Corporation) सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी करू, असं मत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केलंय. नागपूर मनपातील सर्व वॅार्डात निवडणूक तयारी करण्याच्या सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. पदाधिकाऱ्यांवर प्रभागांची जबाबदारी सोपविली. नागपूर मनपात काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिला होता. आता राष्ट्रवादीची स्वबळाच्या दिशेनं तयारी करत आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडे अनेक संस्था आहेत. त्या माध्यमातून लोकांची कामे करण्यावर भर दिला पाहिजे. नागरिकांची मदत करावी. राष्ट्रवादीतील छपास नेत्यांचीही कानउघाडणी केली. कामावर लक्ष द्यावे, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते. राष्ट्रवादीनं आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. गेली पंधरा वर्षे नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. पण, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका (Election) लढण्यास सज्ज असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. मनपा निवडणुकीच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. महापालिका निवडणुकीसाठी 225 जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावे. राज्यस्तरीय नेत्यांनी या निवडणुकीत भाग्य आजमावावे. प्रत्येकाला एकएका प्रभागाची जबाबदारी दिली जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. काही पदाधिकार्यांनी दोन ते तीन प्रभागांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली. अधिकाअधिक जागा जिंकण्यासाठी एका एका प्रभागावर लक्ष केंद्रित करावे, असे वळसे पाटील यांनी सांगितलं.
पक्षसंघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकार्यांनी प्रयत्न करावे, असेही निर्देश वळसे पाटील यांनी रविभवन येथे पार पडलेल्या बैठकीत दिले. बैठकीला शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजीमंत्री रमेश बंग, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, सुबोध मोहिते, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, ईश्वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, वेदप्रकाश आर्य, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, वर्षा शामकुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.