गोंदिया : सालेकसा येथील मैदनावर बिबट्याचे कातळे आणि इतर अवयव विकण्याच्या तयारीतील टोळीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलंय. 12 जणांना नागपूर आणि गोंदिया वनविभागाच्या संयुक्त टीमनं अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली.
वनविभागाच्या या कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे, बिबट नखासह ४ पंजे, दोन बिबट सुळे दात (तुटलेले) व इतर 13 दात, १० बिबट मिश्या आणि 3 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावणी आहे.
आरोपींविरुद्ध वन्यवजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध गुन्हा दाखल करण्यात आला. आमगाव येथील न्यायालयानं आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील व वनपरिक्षेत्राधिकारी ए. बी. इलमकार तपास करीत आहेत.
राधेश्याम उईके (रा. दल्लाटोला), जागेश्वर दशरिया (रा. धनसुवाबोरी), पप्पू मडावी (रा. जांभळी), दिनेश श्रीवास्तव (रा. भंडारा), संदीप रामटेके (रा. मोकारा), दिनेश शहारे (रा. देवरी), विनोद दशरिया (रा. ब्राम्हणटोला), लितेश कुंभरे (रा. बाघनदी, राजनांदगाव), परसराम मेश्राम (रा. गिरोला), रामकृष्ण डहारे (रा, गोबरीटोला), सुभेचंद नेताम (रा. दल्लाटोला), इंदरलाल नेताम (रा. दल्लाटोला) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. बिबटचे कातडे तसेच अन्य अवयव या आरोपींनी विक्रीसाठी आणले होते.
गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला जिल्हा. जिल्हात मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांच्या वावर असतो. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी यांच्या हत्या झाल्याचे दिसून आले. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे वन्यजीव बिबट्याची कातडी आणि अवयव यांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे विभागीय वन अधिकारी ( दक्षता ) नागपूर आणि गोंदिया वन विभाग यांच्याद्वारे सालेकसा तहसील कार्यालयाच्या पटांगणाजवळ सापळा रचण्यात आला.