नागपूर : उन्हाळ्यातील पाणी टंचाई व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. नागपूर महानगरपालिकेतर्फे (Municipal Corporation) टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध पंप जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी (ता. 20) नेहरूनगर (Nehru Nagar) झोन अंतर्गत नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्र. 1, 2 व 3 या भागातील 11 टिल्लू पंप जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b.) यांनी टिल्लू पंप जप्तीचे आदेश विभागाला दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक नागरिक अवैधरित्या नळाला टिल्लू पंप लावून पाण्याची चोरी करीत असतात. यावर आळा घालण्यासाठी मनपाद्वारे टिल्लू पंप जप्तीची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सदर कारवाई नेहरूनगर झोनच्या पथकाद्वारे करण्यात आली.
नागपूर शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात झोपडपट्टी भागात पाण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे अशा भागात पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करा. तसेच शहरातील ज्या भागात पाणी टंचाई आहे अशा भागात टँकरने पाणी पुरवठा करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजनांबाबत मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्तांच्या सभाकक्षात आढावा बैठक पार पडली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनपाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, मनपाचे तांत्रीक सल्लागार (NESL) मनोज गणवीर, ऑरेंज सिटी वॉटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, वरिष्ठ अधिकारी राजेश कालरा तसेच डेलिगेट्स व झोनल व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या दहाही झोनमधील पाण्याच्या सद्यःपरिस्थितीचा आढावा घेतला. शहरात ज्या भागात पाणीटंचाई आहे अशा भागात टँकरने पाण्याची व्यवस्था करा. तसेच झोपडपट्टी भागातील नळाला पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढे ते म्हणाले, असे करीत असतानाच पाण्याच्या समस्येवर वेगवेगळ्या भागातील नागरिकांचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑरेंज सिटी वॉटर कंपनीतर्फे दररोज नागरिकांचा अभिप्राय घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिली.
ज्या ठिकाणी दूषित जल पुरवठा होत आहे अशा ठिकाणी सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. लीक असलेल्या, दूषित पाईपलाईन तात्काळ बदलवून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. झोननिहाय अवैध नळ जोडणा-यांची माहिती तयार करून कारवाई करणे त्याचप्रमाणे टूल्लू पंप थेट नळाला लावणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन, टूल्लू पंप जप्तीची कार्यवाही करणे. नॉननेटवर्क भागात सुद्धा आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावे असे निर्देश आयुक्त यांनी मनपा अधिका-यांना दिले.