राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजींचा (Madhav Golwalkar Guruji) जन्म नागपूर येथे 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव. पण, वडील नोकरीवर असल्याने ते नागपूरला आले होते. गुरुजींची आठ भावंडे दगावली. गुरुजी हे नववे अपत्य. गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये (Hislap College) इंटरपर्यंत शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते लखनौला गेले. पण, तिथं प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून बी. एस्सी व त्यानंतर एम. एस्सी या पदव्या प्राप्त केल्या. पुढं प्राणीशास्त्रात संशोधन करावे, यासाठी ते मद्रासला गेले. परंतु, हवामान न मानवल्यानं नागपूरला परत आले. बनारस विद्यापीठाने (Banaras University) त्यांना 1933 साली तीन वर्षांसाठी प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी गुरुजींशी भेटीगाठी होत.
विद्यापीठातील तीन वर्षांचा सेवाकाळ संपल्यानंतर गुरुजी सारगाची येथील आश्रमात गेले. 1937 साली मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरू अखंडानंद यांच्याकडून गुरुजींनी अनुग्रह घेतला. तेव्हा अखंडानंद यांनी गुरुजींना राष्ट्रदेवो भव हा मंत्र जपत तू देशभर फिरशील, असे सांगितले. अखंडानंद यांच्या निधनानंतर गुरुजी अस्वस्थ झाले. डॉ. हेडगेवारांनी गुरुजींमधील कौशल्य हेरले होते. डॉ. हेडगेवारांनी सिंदी येथे एक विचार शिबिर घेतले. या शिबिराची धुरा गुरुजींवर टाकली. तेव्हापासून गुरुजी संघाची धुरा सांभाळू लागले. संघाचा प्रचार-प्रसार केला. 1941 मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर दुसरे सरसंघचालाक म्हणून गुरुजींना संघाचे सारथ्य केले.
विश्व हिंदू परिषद, विवेकानंद शिला स्मारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम, शिशू मंदिर अशा सेवा संस्थांमागे गुरुजींची प्रेरणा होती. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बरेच आरोप झाले. संघाची प्रतिमा खराब करण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण, गुरुजींच्या नेतृत्वातील संघाने कधी गुडघे टेकले नाही. दरम्यान, गुरुजींना कारावासही झाला. देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न झाला. पण, या सर्वांमधून गुरुजी सहीसलामत बाहेर पडले. संघाचे कार्य राष्ट्रकार्य म्हणून त्यांनी सुरूच ठेवले. शेवटच्या दिवसांत गुरुजींना कँसर झाला. पाच जून 1973 रोजी गुरुजींनी देहत्याग केला. ते आज आपल्यात नाहीत. पण, त्यांचे विचार निरंतर आपल्यासोबत राहतील. आपल्याला प्रेरणा देत राहतील.