नागपुरात येताच संजय राऊत यांनी काँग्रेसला डिवचलं, विदर्भातील ‘त्या’ जागेवर ठोकला दावा; आघाडीत जुंपणार?

| Updated on: Aug 17, 2024 | 6:30 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी विदर्भातील एका जागेवर दावा केला आहे. जागावाटप होण्याआधीच त्यांनी दावा केल्याने मविआमध्ये जुंपणार असल्याचं दिसत आहे. नेमकी कोणती जागा जाणून घ्या.

नागपुरात येताच संजय राऊत यांनी काँग्रेसला डिवचलं, विदर्भातील त्या जागेवर ठोकला दावा; आघाडीत जुंपणार?
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आता महायुती आणि मविआमध्ये जागावाटपावरून एकमत होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जागावाटपाआधीच ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेसला डिवचत नागपूरमधील एका जागेवर दावा ठोकला आहे. लोकसभेला त्यांना ती जागा दिलेली होती आता आम्ही ती जागा लढवणार असल्याचं संजय राऊतांनी माध्यमांंसोबत बोलताना जाहीरपणे सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रमुख नेते विदर्भात आहेत. सर्व जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले, विदर्भातील सगळ्या जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला. यावेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार आहे. ती जागा रामटेक मतदारसंघाची असून त्या दृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. नागपूरचे शहर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी पक्षाच्यावतीने काही कार्यक्रम ठेवले आहेत त्याला उपस्थित राहणार आहोत. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचे काम सूरू आहे ते पाहता मविआकडून आम्ही नागपूर शहर आणि ग्रामीण विभागातील जागा लढवणार आहोत. लोकसभेवेळी काँग्रेसला रामटेकची जागा दिली आता विधानसभेला आम्ही लढवार आहोत. विदर्भामध्ये मविआला उत्तम यश आलं आहे. वर्धा, यवतमाळ, वाशिमची जागा आमच्याकडे आली, त्यामुळे मविआचं यश पाहता विधानसभेला विदर्भात मविआ चांगला स्कोर करेल यात काही शंक नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

लाडकी बहिण याजनेमध्ये विरोधकांनी खोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. यावर बोलताना, फडणवीस स्वप्नात असतात त्यांना स्वच्छ, स्पष्ट दिसत नाही आणि ऐकू येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्याच्यापासून जनतेला, महिलांना फायदा होणार आहे अशी योजना खासगी मालकीची नसून सरकारची असते. आम्ही अशा योजनांमध्ये खोडा टाकण्याचं पाप करणार नाही. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवर्षे केलं आहे. काँग्रेस सरकारच्या योजना स्वत:च्या नावाने खपवल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण या सरकारने त्या बंद करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी रामटेकच्या जागेवर केलेल्या दाव्यामुळे जागावाटपावरून मविआमध्ये आघाडीत जुंपणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  जागावाटपासह मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार यावरूनही बरीच चर्चा होताना दिसत आहे.