नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन उद्या, १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्थगितीच्या बाबतीत म्हणालं, तर अनेक विभागामध्ये तरतूद होती दोन हजार कोटींची. प्रशासकीय मान्यता दिली. सहा हजार कोटी, हे काय चाललं होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या. पण, आम्हाला या राज्याचा काही लवासा करायचा नाही, असं त्यांनी म्हंटलं.
तरतुदीनुसार वागलं पाहिजे आपण. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर काही कामांना स्थगिती दिली आहे. ७० ते ८० टक्के कामांना मंजुरी दिली. आवश्यक त्या कामांवरील स्थगिती उठविली आहे. आकस ठेवून कुठही काम केलेलं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पूर्वी शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर किती कामांना स्थगिती दिली. हे अजित पवार यांना माहिती आहे. कारण ते अर्थमंत्री होते, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी संजय राऊत यांचाही समाचार घेतला. सरकार कोसळण्याचे अनेक मुहूर्त सांगण्यात आलेत. संजय राऊत यांनी फक्त फेब्रुवारी म्हटलं, वर्ष कोणतं ते सांगितलं नाही.
आनंदाचा शिधा किती लोकांपर्यंत पोहचला. याची आकडेवारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. ९६ टक्के लोकांना शिधा पोहचला असल्याचं सांगून अजित पवार यांच्या आरोपातील दम शिंदे यांनी काढला.