VIDEO | नात्याला काही नाव नसावे… नागपुरात दोन तरुणींचा साखरपुडा, कशी जुळली ही रेशीमगाठ?

| Updated on: Jan 03, 2022 | 4:05 PM

नागपूरची सुरभी मित्रा डॉक्टर आहे, तर पश्चिम बंगालची पारोमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नुकताच नागपुरातील एका रिसॅार्टवर त्यांचा साक्षगंध सोहळा पार पडला.

VIDEO | नात्याला काही नाव नसावे... नागपुरात दोन तरुणींचा साखरपुडा, कशी जुळली ही रेशीमगाठ?
सुरभी मित्रा आणि पारोमिता
Follow us on

नागपूर : जात-धर्म, वय आणि मुख्यत्वे लिंग, या पलिकडे जाऊन एकमेकांना जीव लावणाऱ्या दोन व्यक्तींमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी #Love_Is_Love ही संकल्पना अलिकडच्या काळात रुजली आहे. समाजातील तथाकथित रुढींना झुगारुन दोन तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची सहचर होण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. नागपूरची डॉ. सुरभी मित्रा आणि कोलकात्याची पारोमिता यांनी नुकताच साक्षगंध म्हणजेच साखरपुडा सोहळा केला. दोघींना भावी आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नागपुरात दोघींचा साक्षगंध सोहळा

नागपूरची सुरभी मित्रा डॉक्टर आहे, तर पश्चिम बंगालची पारोमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नुकताच नागपुरातील एका रिसॅार्टवर त्यांचा साक्षगंध सोहळा पार पडला. प्रेम करणाऱ्या दोन तरुणींना बंधनात अडकताना कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळाला आहे. येत्या वर्षभरात दोघी एकमेकींसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मूल दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहेत.

कुटुंबाचा पाठिंबा

मी मुलीसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून मला कधीच विरोध झाला नाही. मित्र, कुटुंब, नातेवाईक, भावंडं सगळ्यांनीच स्वीकारलं, एकाही व्यक्तीने माझ्याशी संबंध तोडले नाहीत, उलट पाठिंबाचा मिळत गेला, असं सुरभी मित्राने ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

सुरभीने वयाच्या 19 व्या वर्षी, सगळ्यात आधी वडिलांना सांगितलं होतं. त्यालाही आता अकरा वर्ष झाली. बाबांची प्रतिक्रिया सुरुवातीला तटस्थ होती. ही फेज आहे, निघून जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. दोन वर्षांनी जेव्हा आमचं बोलणं झालं, तेव्हा आपल्याला आजही महिलांविषयीच रोमँटिक अट्रॅक्शन वाटत असल्याचं मी त्यांना सांगितलं. माझे वडील डॉक्टर आहेत. त्यांनी अभ्यास केला, काही मानसोपचार तज्ज्ञांनी ते बोलले. त्यांना याविषयी माहिती मिळाली, तसा त्यांचा विरोध मावळला, असं सुरभी म्हणाली.

“नातं जगजाहीर कशाला करता?”

माझी आई म्हणत होती, की घरी तुम्ही एकमेकींसोबत राहा, मात्र तुमचं नातं जगजाहीर कशाला करता. मात्र मी ज्या समुदायाचं प्रतिनिधित्व करते, त्यांना माझ्या मोकळ्या वर्तनाने बळ मिळेल. जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली, तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल, असं आपल्या मनात आल्याचं सुरभीने सांगितलं.

कुठे झाली ओळख?

पारोमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यात कॉन्फरन्समध्ये झाली. सुरुवातीला इन्स्टाग्राम, आणि नंतर व्हॉट्सअॅपवर त्यांचं बोलणं झालं. त्यांनी ऑगस्टमध्ये एंगेजमेंटचा निर्णय घेतला, मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असं नाव द्यायचं ठरलं. ती अकरावीत असताना – 2003 मध्ये तिचे बाबा आणि बहिणीला तिच्याविषयी समजलं. आईला आता सांगितलं, मात्र तिचा विरोध नाही, असं पारोमिता सांगते.

या नात्यात आम्ही दोघीही पत्नीच असणार. आमच्या घरातही कधी जेंडर रोल बाळगले गेले नाहीत, मुलींनी आणि मुलांनी करायची कामं, यात कधी फरक केला गेला नाही, असं सुरभी म्हणाली.

कोणी कोणाला प्रपोज केलं?

सुरुवातीला आमच्या गप्पा रंगल्या, बोलता-बोलता आवडी जुळल्या, मग पारोमिताने प्रपोज केलं, असं सुरभीने सांगितलं. सुरभीचा फोन सहा-सात दिवसांसाठी बंद होता. सात दिवसांनी तिचा मेसेज आला, तेव्हा पारोमिताने न राहवून विचारलं की ठीक आहेस ना. तिची काळजी आणि प्रेम सुरभीला जाणवलं. ‘मी प्रपोज केलं, तर रिजेक्ट करशील का?’ असा प्रश्न पारोमिताने विचारला. त्यावर ‘मी असं का करेन?’ या उत्तराने सुरभीने अप्रत्यक्षरित्या आपला होकार कळवला.

सुरभी आणि पारोमितासोबत गप्पा, पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

Gay Couple | लग्नाच्या बेडीत अडकले ते दोघंही ‘गे’, त्यांच्या लग्नाचा अल्बम एकदा बघून तर घे…!