Bunty Shelke : काँग्रेसचा उमेदवार थेट भाजपाच्या कार्यालयात, ऐन निवडणुकीत पठ्ठ्याने जिंकली सर्वाची मने, नागपूरमधील तो Video व्हायरल

| Updated on: Nov 12, 2024 | 10:59 AM

Congress Candidate in BJP Office : निवडणुका आल्यानंतर राजकीय चिखलफेक सर्वदूर पसरली आहे. अनेक मतदारसंघात टोकाचे वाद सुरू आहेत. तर काही ठिकाणी काटा काढण्यासाठी डमी उमेदवाराचा प्रयोग सुरू आहे. पण त्यातच नागपूरमधील काँग्रेसच्या या उमेदवाराच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहे.

Bunty Shelke : काँग्रेसचा उमेदवार थेट भाजपाच्या कार्यालयात, ऐन निवडणुकीत पठ्ठ्याने जिंकली सर्वाची मने, नागपूरमधील तो Video व्हायरल
काँग्रेस उमेदवार थेट भाजपा कार्यालयात
Follow us on

राज्यात गेल्या आठवड्यापासून जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सुरू झाला आहे. वैखारी प्रचाराला आणि टीकेला सुरूवात झाली आहे. आता प्रचाराला अवघा आठवडा उरला आहे. त्यात अजून अनेक जण एकमेकांची उणेदुणे काढल्याशिवाय राहणार नाहीत. त्यात मोठी नेतेच मागे नाहीत तर स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे वितुष्ट तर विचारायलाच नको. मतदानाच्या काळात अजून किती वितुष्ट पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. पण सगळीकडंच असं वातावरण आहे, असं नाही. नागपूरमध्ये एका व्हिडिओने सध्या देशातील तरुणांचे हृदय जिंकलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारानं थेट भाजपाचं कार्यालय गाठल्यानंतर राजकारणातील एक सकारात्मक बाजू सुद्धा समोर आली आहे.

थेट भाजपा कार्यालयात काँग्रेसचा उमेदवार

हे सुद्धा वाचा

विदर्भात भाजप आणि काँग्रेसमध्ये यावेळी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेत केवळ दोन जागांवर भाजपाला समाधान मानवं लागलं होते. आता विधानसभेत चित्र पालटवण्यासाठी भाजपानं शड्डू ठोकले आहेत. नागपूरमध्ये तर दोन्ही पक्षात कडवी झुंज दिसून येत आहे. पण नागपूर मध्य मतदारसंघात मात्र एक वेगळीच घटना घडली. तिचे पडसाद संपूर्ण देशात उमटले.

नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून बंटी शेळके हे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने प्रवीण दटके यांना आखाड्यात उतरवले आहे. या मतदारसंघात चुरशीचा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. प्रचाराच्या धुमधडाक्यात बंटी शेळके यांच्या एका कृतीने सर्वच जण अवाक झाले. ते पळत पळत थेट भाजपाच्या प्रचार कार्यालयात घुसले. तिथे असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांशी त्यांनी हस्तांदोलन तर केलेच. पण एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे आशीर्वाद सुद्धा त्यांनी घेतले. इतकेच नाही तर मनात कोणतीही कटुता न ठेवता भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिला. मोहब्बत की दुकानची ही कृती सर्वांनाच आवडत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पक्षीय लोकशाहीकडे झुकलेल्या भारतात असं चित्र फार दुर्मिळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी राजकीय नेते, पदाधिकारी यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याची जागा खूनशी राजकारणाने आणि बदल्याच्या राजकारणाने घेतल्याचा आरोप होत आहे. बंटी शेळके आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची ही कृती अनेकांना भावली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.