नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर एके 47 ने उडवून देणार असल्याचं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातूनही एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या धमकीनंतर संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. या प्रकारावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत होती, असा प्राथमिक रिपोर्ट आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. धमकी कोणीही दिली असली तरी कारवाई होईल. राज्यात कोणी कुणाला धमकी दिली तरी पोलीस आणि सरकार शांत बसणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जे जे लोक चुकीचं काम करतील, बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल. मी आधीही सांगितलं आहे. आताही सांगतो. मी कुणाला घाबरत नाही. कुणालाही दबत नाही. मी कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल, असं सांगतानाच राऊत यांना आलेल्या धमकीवरून चेष्टा करण्याचं काय कारण आहे? असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे, याची मला जाणीव आहे. मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल असं अनेक लोकांना वाटत आहे. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा चार्ज दिलाय. जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून या पूर्वी पाचवर्ष मी सांभाळली आहेत. आताही जे लोकं बेकायदेशीर कामे करतील त्यांना मी सोडणार नाही, असा इशाराच फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर असं या तरुणाचं नाव आहे. पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागातून घेतले ताब्यात. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. तळेकर याला पुणे पोलिसांनी दिले मुंबई पोलिसांच्या ताब्यात.