सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : एका नायजेरियन व्यक्तीने (Nigerian gang) नागपुरातील महिलेसोबत आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर तिला महागडा गिफ्ट पाठवण्याच्या बाहण्याने तिची ऑनलाईन फसवणूक (Many people were cheated) केल्याचा प्रकार पुढे आला. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीमधून एका नायजेरीयन व्यक्तीला अटक करण्यात यश मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती वीजा संपूनसुद्धा दिल्लीत राहत होता.
नागपूरतील एका सुशिक्षित महिलेची सोशल मीडियावरून एका विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली. तो नायजेरीयाचा रहिवासी असल्याचं त्याने सांगितलं. त्यांची ओळख वाढल्यानंतर त्याने तुला एक महागडा गिफ्ट पाठवतो, असं सांगितलं.
ते गिफ्ट पाठवल्यानंतर मग एक दिवस या महिलेला कस्टम ऑफिसमधून फोन आला. मी कस्टम ऑफिसर बोलतो आहे. तुमचं एक गिफ्ट पार्सल आलं आहे. त्याला सोडवण्यासाठी काही पैसे तुम्हाला भरावे लागतील, असं सांगितलं.
महिलेने ते पैसे भरले. मात्र ते गिफ्ट महिलेपर्यंत पोहोचलं नाही. तिच्या खात्यातून पैसेसुद्धा गेले. त्यामुळे महिलेने सायबर पोलिसांकडे याची तक्रार केली. तक्रारीचा तपास करत असताना त्या व्यक्तीचे लोकेशन दिल्लीच दिसत होते. सायबर पोलिसांची टीम दिल्लीला पोहोचली.
नायजेरीयन व्यक्तीला अटक केली. महत्त्वाचं म्हणजे या नायजेरीयन व्यक्तीचा वीजासुद्धा अनेक दिवसांपूर्वी संपला. तो अवैधरीत्या दिल्लीमध्ये राहत होता. असे फसवणुकीचे धंदे करत होता. अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी अंकित चांडक यांनी दिली.
नागपुरात याआधीसुद्धा नायजेरीयन टोळीकडून अनेकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाली. मात्र तरीही नागरिक यांच्या जाळ्यात अडकतात. हे त्याचा फायदा घेतात. अशा लोकांपासून सावध राहण्याचा आवाहन पोलिसांनी केलंय.
काही लोकं आमिषाला बळी पडतात. समोरच्या माणसाची योग्य पद्धतीने शहानिशा करत नाही. त्यामुळे त्यांची फसगत होते. त्यामुळे ऑनलाईन गोष्टी करत असताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण फसवणूक झाल्यावर शोक व्यक्त करत बसण्याऐवजी काही राहत नाही.