नागपूर : रविवारी रात्रीची गोष्ट. इंदिरा गांधी रुग्णालयाचा (Indira Gandhi Hospital) परिसर. रुग्णालय म्हटलं की शांत परिसर असतो. पण, अचानक घबराहट सुरू झाली. कारण एक अनोळखी प्राणी रुग्णांना दिसला. या परिसरात हा कोणता प्राणी यावरून चर्चा सुरू झाली. कुणीतरी सांगितलं हा तर मसन्याऊद. मग, या प्राण्याचे करायचं काय? वाईल्ड लाईफ (Wildlife) वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांना कळविण्यात आलं. त्यांनी वनविभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरशी (Transit Center) संपर्क साधला. ट्रान्झिटचे पथक घटनास्थळी पोहचले. पथकातील कर्मचारी मसन्याऊदच्या शोधात लागले. तो इकडून तिकडं पळत होता. कर्मचारी मसन्याऊदच्या मागे धावत होते. रात्रीची वेळ असल्यानं कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. शेवटी हा मसन्याऊद पथकाच्या हातात लागला.
वाइल्ड लाईफ वेलफेअरच्या वन्यजीव प्रेमींनी मसन्याऊदाला पकडण्यात मदत केली. त्यानंतर त्याला वनविभागाच्या हवाली करण्यात आले. शव उकरून खाणाऱ्या जमातीमध्ये या मसन्याऊदाचा समावेश होता. गोरेवाडा जंगलातून शहरात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मसन्याऊदाची प्रकृती उत्तम आहे. त्याला लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. सध्या तो ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आहे.
नागपुरातील इंदिरा गांधी रुग्णालयात सापडलेला मसन्याऊद pic.twitter.com/UR9Q2o9fsV
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 4, 2022
रुग्णालय परिसरात मसन्याऊदाचा शोध घेताना काहींनी पाहिले. हा कोणता प्राणी आहे. याबद्दल काहींना कुतूहल वाटले होते. कारण बऱ्याच जणांनी तो पहिल्यांदा पाहिला. मांजरीसारखा दिसणारा असा हा प्राणी आहे. मसन्याऊद हा प्राणी सापडल्यानं इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. हा प्राणी कुठून आला असेल यावरून चर्चा सुरू झाली. गोरेवाडा जंगलातून तो आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मसन्याउदाला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.