नागपूर : राज्यात काँग्रेसच्याच काही मंत्र्यांवर काँग्रेस आमदारांची वाढती नाराजी आहे. राज्यातील काही मंत्र्यांवर नाराज असलेले काँग्रेस आमदार दिल्लीत हायकमांडची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सात ते आठ नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत हायकमांडशी भेटून खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांची तक्रार करणार असल्याची टीव्ही 9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. दहा दिवसांपूर्वी विदर्भातल्या नाराज काँग्रेस आमदाराने दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांवर काँग्रेसच्याच आमदारांची नाराजी वाढत आहे. हे आमदार के. सी. वेणुगोपाल यांना भेटून त्यांच्याकडं याची तक्रार करणार आहेत.
गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामावर नाराजी वाढते आहे. या मंत्र्यांचा आमदारांना काही फायदा होत नाही. हे मंत्री स्वतःचा फायदा करून घेतात, अशीही काँग्रेसच्या आमदारांची तक्रार आहे. या आमदारांनी सत्तेत जाण्यासाठी पाठिंबा दिला होता. परंतु, आता सत्ता असूनही आमदारांची कामे होत नसल्याची याच आमदारांची ओरड आहे. काँग्रेसचे मंत्री विकासकामांसाठी पैसे ओढून आणू शकत नाहीत, अशी या आमदारांची नाराजी आहे. त्यामुळं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
नागपुरात काँग्रेस स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीसोबत, याबाबत आज काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत ही बैठक घेणार आहेत. बैठकीत नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहतील. तसेच काँग्रेसचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.