नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. 5 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत आहेत. 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरुवात झाली. तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना हातमोजे देण्यात आले. थर्मल स्कॅनिंगद्वारे तापमान मोजूनच मतदारांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. महानगरपालिकेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या तहसील कार्यालयात, तर जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार निवास परिसरातील ग्रामीण तहसील कार्यालयात मताधिकार बजावला.
या निवडणुकीत भाजपनं आधीच आपली उमेदवारी जाहीर करत चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसनं मात्र मोठा गाजावाजा करत भाजपमधून आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला होता. मात्र, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसनं आपल्या अधिकृत उमेदवाराने असमर्थता दर्शविल्याचं सांगत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, छोटू भोयर यांनी आज मतदान केल्यावर आपण असर्मथता दर्शविली नव्हती, तरी काँग्रेसनं उमेदवार बदलविला असं सांगत आपली नाराजी व्यक्त केली.
कॉंग्रेसवर ऐनवेळी अधिकृत उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की आल्यानं या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपकडे संख्याबळ अधिक असल्यानं भाजपचं पारडं जड आहे. कॉंग्रेसला मात्र चमत्काराची अपेक्षा आहे.