नागपुरात विवेक या ग्रंथाचं प्रकाशन पार पडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडलं आहे. यावेळी मोहन भागवत यांनी संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर भाष्य केलं. “संघाचं संपूर्ण वर्णन विवेक या ग्रंथामध्ये आहे. संघ संघ म्हणतात तो कसा, ज्यांच्या जीवनाकडे बघून त्याचं दर्शन होते ते या ग्रंथातून होतंय. या ग्रंथाचा अध्ययन होण्याची आवश्यकता सर्वांनाच आहे. देश विदेशातील जाणकार लोक, जगाच्या परिस्थितीचे चिंतन करणारे लोक, त्यांना वाटतं की आज जे काही चालू आहे त्यात संघ हा एक महत्त्वाचा घटक आहे. तसा संघ नुसता बुद्धीने समजणं अवघड आहे. त्यामुळे हा ग्रंथ संघ समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. संघाविषयी अनेकांमध्ये आस्था निर्माण झाली आहे. संघासोबत जुळू इच्छितात ते वेबसाईटच्या आणि इतर माध्यमातून जुळतात”, असं मोहन भागवत म्हणाले.
“संघाचा स्वयंसेवक हा शाखेत आला आणि त्याने संघ समजून घेत उलगडण्याचा प्रयत्न केला. आजचा काळ जो आहे तो अध्ययन करण्याचा काळ आहे. संघाच्या स्वयंसेवकासाठी अध्ययन करण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. काही साधन नसताना विचारांचा विरोध असताना बिना साधनाने संघ सुरू झाला. तेव्हाच्या कार्यकर्त्यांना फार कठीण काळ होता. त्या काळामध्ये संघाचा कार्यक्रम करायचा म्हटलं तर पैसा लागायचा. तो गोळा करणे फार कठीण असायचं. आजचा काळ हा अनुकूलतेचा आणि साधन संपत्तीचा आहे. त्या काळात संघाची स्तुती कधी कुठे ऐकायलाच येत नव्हती. आम्ही कठीण दिवसात वाढलो आणि मोठे झालो. एकही शब्द कौतुकाचा कानावर पडला नसला तरी आम्ही वाढत राहिलो असा संघाचा प्रवास झालेला आहे”, अशी आठवण मोहन भागवत यांनी सांगितली.
“मात्र परिस्थिती बदलते. संघाने काय केलं यापेक्षा संघाचे स्वयंसेवक काय असावे असा विचार संघ ठेवतो. आपल्या देशामध्ये आपले कोण याची स्पष्टता नाही. लागोपाठ आलेल्या गुलामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास नाही म्हणून आपल्याला जोडणाऱ्या सर्व सूत्रांच्या आधारावर समाज संघटीत करायचा आहे आणि आपण जगापुढे आपली ओळख मांडली पाहिजे. ती ओळख एक मात्र अशी जगात आहे जी आपल्याला ओळख देऊन जाते”, असं मोहन भागवत म्हणाले.
“अभिमानाने आणि गौरवाने म्हटलं पाहिजे आम्ही हिंदू आहोत. सर्व प्रकारच्या परिस्थितीतून जगाचं, राष्ट्राचं जीवन नीट चालावं. कुटुंबांचा व्यक्तींचे जीवन नीट चालावं, अशा प्रकारचा एक पराकोटीत चालत आलेला धर्म हा आपला धर्म आहे आणि त्याला आपण हिंदू धर्म म्हणतो. त्याला सनातन धर्म मानव धर्म असं म्हणतो. त्या धर्माच्या आधारावर वागलं पाहिजे”, अशी भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
“ज्ञान, विद्वान खूप आहेत. आपण कोण याची ओळख जागती ठेवून आपण आचरण केलं पाहिजे. तर परिस्थितीत जगण्याची ताकद आपल्याजवळ येते. हे करत असताना आपल्या प्रश्नांना निरस्त करून आपण जगाच्या प्रश्नाचा विचार करू शकतो. उपाय देऊ शकतो. ही व्यापक दृष्टी पहिल्यापासून आहे. त्यावेळी ती तशी मांडली गेली नाही. कारण त्यावेळी शक्ती नव्हती. जसजशी शक्ती वाढत गेली संघाचा विचार समोर येत गेला. सगळ्या जगामध्ये कोणीही दुःखी राहू नये अशी कामे करावी लागणार आहे जे संघ जगतात त्यांच्यावर संघ चालतो संघ साधनावर चालत नाही”, असं मोहन भागवत म्हणाले.