नागपूर : कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढलंय. या काळात जिल्ह्यातील साधारण १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता वर्तवलीय जातेय. ज्या बालविवाहाची गुप्त माहिती, महिला आणि बालकल्याण विभाग आणि पोलिसांना मिळाली, असे नागपूर जिल्ह्यातील 17 बालविवाह महिला व बालकल्याण (Women and Child Welfare) विभागाने रोखलेत. बालविवाहातून नागपुरात एमआयडीसी (MIDC in Nagpur) भागातील 12 वर्षांची मुलगी गरोदर झालीय. आता तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत या 12 वर्षांच्या गरोदर मुलीचं समुपदेशन सुरू आहे. त्या 12 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताबाबत तज्ज्ञांचा विचार सुरू आहे. त्या अल्पवयीन गरोदर मुलीच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार? हा प्रश्न उपस्थित होतोय. नागपूरच्या एमआयडीसी भागातील धक्कादायक घटना घडली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला अटक केलीय. अशी माहिती बाल कल्याण अधिकारी मुस्ताक पठाण (Child Welfare Officer Mustak Pathan ) यांनी सांगितलं.
महिला दिनी बालसंरक्षण कक्षाने अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविला. लग्न करणारा नवरदेव 19 वर्षांचा तर नवरी 17 वर्षांची निघाली. गावाने विशेष ग्रामसभा बोलावून अल्पवयीन मुलीचा विवाह गावात होणार नाही, असा ठराव घेतला. नऊ मार्च रोजी कोदामेंढी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. याची माहिती बालसंरक्षण कक्षाला देण्यात आली. मुलीचे समुपदेशन करून मुलगी अठरा वर्षांची होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं ठरलं. अंगणवाडी सेविकेकडून ही माहिती बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण , बालविकास प्रकल्प अधिकारी माधुरी खोब्रागडे, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, पोलीस अधिकारी माधव चाबुस्कर हे गावात पोहचले. विशेष ग्रामसभा भरविण्यात आली. ग्रामसभेत सरपंच भगवान बावनकुळे, आर. एस. गजभिये, नीलेश दम्तेवार, उमेश लिमजे, रामदास बावनकुळे, अलका प्रकाश देवतळे, संदीप गौरखेडे, प्रकाश देवतळे, शर्मिला मेश्राम आदी उपस्थित होते. ग्रामसभेत बालविवाह गावात होऊ देणार नाही, असा ठराव घेण्यात आला.