नागपूर : नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. नागपुरात गड्डीगोदाम परिसरातील मकोसाबाग येथे असलेल्या जे. पी. हाईट्स या इमारतीची वॉल कंपाउंडवर तीन-चार झाडं कोसळली. नागपूर शहरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंडवाना परिसरातील जेपी हाईट्स नावाच्या बहमजली इमारतीची सुरक्षा भिंत शेजारच्या घरावर कोसळली. आदिवासीनगरात यादव यांचे घर आहे. अपार्टमेंटमध्ये मोठमोठी झाडं आहेत. गुरुवारी आलेल्या वादळी वाऱ्याने चार झाडं कोसळली.
यामध्ये वॉल कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या झोपडीवर कोसळून त्यामध्ये आई आणि मुलगा असे दोघेजण दबले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि पोलीस जवानांनी त्या ठिकाणी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन केलं. मात्र सकाळपर्यंत त्या ठिकाणी बघीतलं तर सगळी झाड पडलेली दिसली. तसेच वॉल कंपाऊंडची भिंत झोपडीवर पडलेली पाहायला मिळाली.
यादव यांची झोपडी उद्धवस्त झाली. यात ज्योती अशोक यादव (वय ४५) आणि अमन अशोक यादव (वय १६) अशा दोघांचा मृत्यू झाला. बाहेर वादळ वार सुरू असल्याने मायलेक घरीच होते. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सदर पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आधी अमला बाहेर काढून मेयो रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी अमनला मृत घोषीत केलं.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. तणावाची परिस्थिती पाहता दंडा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. ज्योती यादव यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. रॉक ब्रेकरने भितींचा भाग तोडून मलबा हटवण्यात आला. ज्योतीचे पती अशोक यांचा पानठेला आहे.
सोसायटीच्या भिंताला भेगा पडल्या होत्या. ही भिंत केव्हाही कोसळण्याची भीती होती. परिसरातील लोकांनी याच्या तक्रारी केल्या होत्या. मनपाकडून कोणतंही समाधान झालं नव्हतं. सोसायटीच्या सदस्यांनीही याकडे लक्ष दिलं नव्हतं, असा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेमुळे वस्तीत नागरिकांमध्ये रोष आहे.