नागपूर : घर बांधकामासाठी वाळू गरजेची आहे. यासाठी नदीतून वाळूचा उपसा केला जातो. पण, विशिष्ट ठिकाणाहून प्रमाणात वाळूच्या उपशाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी सरकारला रॉयल्टी (royalty) भरावी लागते. पण, वाळूची वाहतूक करणारे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावत होते. भोपाळच्या गोविंदपूर येथून छापामारी करत रॅकेटचा मुख्य सुत्रधार राहुल नरेश खन्ना याला गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळं रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. खापा येथील तीन तर सावनेरमधील दोन वाळू तस्करांना जेरबंद केले. मध्य प्रदेशातील वाळू माफियाच्या मदतीने राज्यात वाळूची तस्करी सुरू होती. या वाळू माफियांवर गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले. यामुळे वाळूचा पुरवठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाळूचे ट्रक पकडले होते. चौकशीत वाळू माफियाने मध्यप्रदेशातून वाळू आणल्याची माहिती समोर आली. मध्य प्रदेशातून जारी करण्यात आलेली ट्रांजिस्ट पास (टीपी) दाखविली होती. परंतु, तपासामध्ये ती टीपी बोगस (bogus TP) असल्याचे समोर आले.
राहुल खत्री हा शहरातील वाळू माफियांना बोगसरीत्या मध्यप्रदेशची टीपी उपलब्ध करून देत होता. या टीपीच्या आधारावर नागपूर जिल्ह्यातील वाळू माफिया वेगवेगळ्या घाटातून विना रॉयल्टी वाळूचे उत्खनन करत असतं. विना रॉयल्टीची वाळू बाजारात विकत होते. पोलिसांनी सावनेर, खापा येथील वाळू माफियांच्या टोळीला अटक केली. खापा येथील सुरेंद्र विठोबा सावरकर (31), पीयूष राजेंद्र बुरडे (28), ईशान लहूकुमार बांगडे (31) आणि सावनेर येथील आशीष मुलचंद गौर (26) व महेश चंद्रप्रकाश चकोले (36) यांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
अशा रॅकेटमध्ये घाट घेणारे ठेकेदारही तेवढेच जबाबदार असतात. पण, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वीही पोलिसांनी चोरी करण्यात आलेल्या वाळूचे ट्रक पकडले. वाहन चालक आणि ट्रांसपोर्टरवर कारवाई करण्यात आली. रॉटल्टीची पावती पाहिल्याशिवाय वाळूची उचल करता येत नाही. या प्रकरणात बोगस टीपीचा वापर केला जात होता. मध्य प्रदेशातील बोगस टीपी दाखवून नागपूर जिल्ह्यातील वाळूवर डल्ला मारला जात होता. याला ठेकेदारही तेवढ्यात प्रमाणात जबाबदार आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.