सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : दोन दसरा मेळावे मुंबईत होत आहेत. एक ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर, तर दुसरा शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. दोन्ही शिवसेनेचं गट शक्तिप्रदर्शन करत आहेत. या मेळाव्यात खासदार, आमदार आणि काही कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. अशी माहिती रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. त्यामुळं शिंदे गटाच्या बीकेसीवरील मेळाव्यात कोणते खासदार आणि कोणते आमदार प्रवेश करणार, याची उत्सुकता आहे. याशिवाय काही नेतेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं कोणते नेते शिंदे गटात प्रवेश करतात, हे पाहावं लागेल.
शिंदे गट खासदार कृपाल तुमाने हे आज नागपुरात संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावर त्यांनी सांगितलं मी दरवर्षीच सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण ऐकायला येत असतो. एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटना आहेत.
हिंदुत्वाचा विचार या ठिकाणी होतो. त्यामुळे मी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो. सकाळी नागपुरात विजयादशमी मेळाव्यात येत असतो. त्यानंतर संध्याकाळी मुंबईला दसरा मेळाव्याला जात असतो. आजही जात आहे. शिंदे गट हे हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना आहे. हिंदुत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे.
शिंदे गटाचा मुंबईत होणारा दसरा मेळावा हा भव्य दिव्य असेल. याला शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही. पण मेळावा भव्य दिव्य असेल. यात अनेक नवीन चेहरे पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत, असं शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं.
आजसुद्धा काही मोठे खासदार, आमदार आणि नेत्यांचा प्रवेश ठरलेला आहे. बीकेसीवरचा मेळावा हा भव्यदिव्य असेल. बाळासाहेबांचे विचार या राज्यातच नव्हे तर देशात पोहचविण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.