नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातलं मुंगोली गाव दोन दिवसांपूर्वी प्रचंड हादरले. वेकोलीच्या कोळसा खाणीतील स्फोटांमुळे वणी शेजारच्या मुंगोली गावातील घरांना हादरे बसतात. बुधवारी केलेल्या स्फोटात घरांना तडे गेलेत. तर काही घरांचं छप्पर उडालं. सततच्या घटनांमुळे मुंगोली गावातील लोक भयभित झालेत.
वेकोली कोळसा खाणींच्या स्फोटांमुळे जीवहानी झाल्यास जबाबदार कोण?, असा संतप्त सवाल यवतमाळ जिल्ह्यातील मुंगोलीचे उपसरपंच रूपेश ठाकरे यांनी केलाय.
मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. परंतु, वेकोली प्रशासन याकडं दुर्लक्ष करीत आहे. गावाला स्फोटाचे हादरे बसतात. कोळशाच्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. धुळापासून श्वसनाचे आजारही वाढलेत. तसेच गाड्यांच्या होणाऱ्या कर्णकर्कस आवाजानं कानांवरही विपरित परिणाम होतोय.
नेहमीच्या हादऱ्यांमुळं मुंगोली गावातील लोकं भयभित झालेत. आता येथे आणखी किती दिवस आणि कसे काढावेत, असा प्रश्न त्यांना पडलाय. स्फोटाच्या हादऱ्यानं शारदा मासेलकर यांचं घर पडलं. अशाच प्रकारे मागील काही दिवसांपासून घरांची पडझड होत आहे. घरांना भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळं आतातरी वेकोली प्रशासनानं जागं व्हावं. मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचं काम जलदगतीनं करावं, अशी मागणी उपसरपंच रूपेश ठाकरे यांनी केलीय.
कोळसा काढण्यासाठी वेकोली प्रशासनाला स्फोट घडवून आणावे लागतात. या स्फोटाचे हादरे मुंगोली गावाला बसतात. हे नेहमीचेच झाले असल्यानं गावकरी त्रस्त आहेत. गावात कोळशाची वाहतूक करण्यासाठी ट्रक येतात. या ट्रकांचा कर्णकर्कश आवाज ऐकूणही गावकरी परेशान झाले आहेत.