नागपूर : मनपाची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. पण, अद्याप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा मंजूर झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिलीय. यामुळं या निवडणुका पुढं जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
2017 च्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर 2016 पर्यंत महिला व पुरुषांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना निश्चित झाली होती. यंदी ही प्रक्रिया दीड महिना उशिरानं होतेय. शिवाय मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असतात. याचा विचार करता मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
राज्य सरकारनं आधी एक सदस्यीय पद्धतीनं निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. पण, नंतर राज्य मंत्रिमंडळानं तीन सदस्य पद्धतीनं निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळं आराखडा तयार करण्यात विलंब झाला. महानगरपालिकेनं तीन डिसेंबर रोजी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडं पाठविलाय. यापूर्वीच्या नियोजनानुसार, 30 नोव्हेंबरला कच्चा आराखडा तयार करून निवडणूक आयोगाकडं पाठविण्यात येणार होता. आता यावर आक्षेप, सूचना मागविल्यानंतर अंतीम आराखडा जाहीर केला जाईल.
नवीन प्रभाग रचनेत जुनी प्रभाग रचना बदलेल. प्रभागातील नेमका कोणता भाग वगळला आणि कोणता भाग जोडण्यात आला. याची माहिती उभेच्छुकांना नाही. त्यांमुळं या प्रभाग रचनेकडं उभेच्छुकांच लक्ष लागलंय. कोरोनामुळं 2021ची जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळं 2011 ची लोकसंख्या गृहित धरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, गेल्या 10 वर्षांत लोकसंख्या वाढल्यानं कायद्यात बदल करण्यात आला. महापालिकेची सदस्य संख्या वाढविण्यात आली. प्रभाग रचनेकडं इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.