नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातल्या काही नगर पालिका (Nagarpalika) व नगर पंचायती निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, जुलै, ऑगस्टची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी पूर परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 80 टक्के मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने राज्य सरकारसोबत सल्ला न करता निवडणूक जाहीर केल्या आहेत. सर्व पक्षीय कार्यकर्ते निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. आम्ही सोमवारी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात 92 नगर परिषदांमधील (Nagar Parishad) राजकीय कार्यकर्त्यांसह निवडणूक आयोगाला भेटणार आहोत, अशी माहिती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सप्टेंबरपर्यंत प्रशासन पूर्णपणे खरीप हंगाम, शेती विषयक बाबी तसेच पूर परिस्थिती सांभाळण्यात व्यस्त असतो. अशा काळात निवडणूक लावून त्यांच्यावर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
आमचे सरकार येऊन 2 दिवस झाले आहेत. नाना पटोले ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची चूक असल्याचे वक्तव्य करत आहेत. खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाचा खून नाना पटोले आणि तुमच्या सरकारनं केला आहे. फडणवीस आणि विद्यमान सरकार ओबीसी आरक्षण लवकरात लवकर मिळवून देणार आहे, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अडीच वर्ष सरकार असताना नाना पटोले तुम्ही काहीच केले नाही. आता तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही गप्प बसा, असंही बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या चुकीमुळे विजेचे दर वाढले आहेत. जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत कोळसाचे नियोजन करावे लागते. मात्र यांनी ते केले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात यांना महागडी वीज खरेदी करावी लागली. जानेवारी ते जूनपर्यंत जी महागडी वीज खरेदी केली, त्याचा भार आता वीज ग्राहकावर टाकण्यात आला आहे. आता जुलै महिन्यापासून किमान चार ते पाच महिने ग्राहकांना तो भार महागड्या विजेच्या स्वरूपात सोसावा लागणार आहे. झालेली वीज दरवाढ 80 पैसे ते 1.25 रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढी वीज दरवाढ कधीही झालेली नाही. ही वीज दरवाढ महाविकास आघाडी सरकारच्या चुकीमुळे झालेली आहे. त्यामुळे एका प्रकारे हे महाविकास आघाडी सरकारने जनतेकडून केलेली लूटच आहे.