नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या अमूल्य अशा वस्तू शासनाच्या उदासीन धोरणामुळे पेटीबंद आहेत. नागपूरच्या चिंचोली येथील शांतीवनात या वस्तू आज जागा नसल्याने पेटीबंद आहेत. शासनाने निधी न उपलब्ध करून न दिल्यानं संग्रहालयाचे काम रखडलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या जवळपास 500 अमूल्य वस्तू नागपुरात आहेत. बाबासाहेब यांच्यानंतर त्यांच्या वस्तू त्यांचे स्वीय सहायक नानकचंद रात्तु यांनी वामनराव गोडबोले यांच्याकडे दिल्या. वामनराव गोडबोले हे पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचे सचिव होते. बाबासाहेबांनंतर रात्तु त्यांनी वामनराव गोडबोले (Vamanrao Godbole) यांच्याकडे या वस्तू दिल्या. नागपूर जिल्ह्यातील चिचोली येथे येथील शांतीवनात (Shantivan) या सर्व वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.
मधल्या काळात यातील काही वस्तू खराब होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. 2011 मध्ये याठिकाणी यासर्व वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी मोठं संग्रहालय व्हावं या हेतूने 2011 मध्ये विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील 32.5 कोटी रुपये शांतीवनाला मिळाले. त्यातून संग्रहालय, वसतिगृह, उपासना कक्ष यांचं काम सुरू झालं. मात्र, आता राज्य सरकार ही जागा आणि वस्तू सामाजिक न्याय विभागाने देण्याचा आग्रह करत आहे. उर्वरित 7.5 कोटी रुपये थांबविले आहे. त्यामुळं सर्व काम अर्धवट अवस्थेत आहेत. परिणामी बाबासाहेबांच्या वस्तू पेटीबंद ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती शांतीवन प्रमुख संजय पाटील यांनी दिली.
ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी दलित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून दिला, या देशाला संविधान दिलं त्याच बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू ठेवण्यासाठी आज संग्रहालय नाही, ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांच्या वस्तूंच्या रुपानं नव्या पिढीला अनुभवता येईल. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळं या वस्तू पेटीबंद आहेत. त्यामुळं संग्रहालयासाठी उर्वरित निधी वळता करून बाबासाहेबांच्या वस्तू कशा लोकांना बघता येईल, यासाठी शासनानं प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरू लागलीय.