नागपूर : थर्डी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी साऱ्यांचीच धावपळ सुरू आहे. आज सकाळपासून लांब रोटीच्या दुकानात रोट्या तयार करण्यात आल्या. या रोटीला शहरात चांगलीच मागणी आहे. त्यामुळं रोटीचे रेटही तगडे झाले आहेत. निर्बंध लावण्यात आले असले, तरी लोकांनी सकाळपासूनच थर्टी फर्स्टची तयारी केली.
नागपूर जसे सावजीसाठी प्रसिद्ध आहे. तसे ते लांब रोट्यांसाठीही प्रसिद्ध आहे. या लांब रोट्या मटणासोबत खाण्यासाठी जास्तीत जास्त वापरल्या जातात. विशेष म्हणजे या लांब रोट्यांची दुकानही फुटपाथवर मटण शॉप्सच्या बाजूलाच आहे. यंदा कोरोनाच्या सावटामुळं थर्टी फर्स्टवर निर्बंध लागलेत. रात्री नऊनंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. म्हणून लोकांनी सकाळपासूच रोट्यांची मागणी केली.
एका रोटीला सहा रुपये लागतात. पण, आज मागणी जास्त असल्यानं एक रोटीची किंमत आठ रुपये होती. एक पायली कणकीच्या रोट्या बनवून द्यायला सहसा 140 रुपये घेतले जातात. पण, आज मागणी जास्त असल्यानं 170 रुपये घेतले गेले. रोट्या बनविणाऱ्या महिला सकाळपासूनच कामाला लागल्या.
याठिकाणी रोटी ही चुलीच्या स्वयंपाकावर केली जाते. म्हणजे सिलिंडरचा वापर होत नाही. लाकडं जाळून त्यावर मातीपासून तयार केलेला मटका ठेवला जातो. या मटक्यावर म्हणजे नैसर्गिकरीत्या रोटी तयार होत असल्यानं याची चव काही न्यारीच असते.
गेल्या तीन महिन्यांतील सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या आज दिसून आली. शहरात 81 कोरोनाबाधित रुग्ण गेल्या चोवीस तासांत सापडलेत. त्यामुळं थर्टी फर्स्ट साजरा करा. पण, जरा जपून असं म्हणण्याची वेळ आली आहे. बाधितांची संख्या वाढू नये यासाठी प्रशासन शक्य ते प्रयत्न करत आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. खा, प्या मजा करा. पण, काळजी घ्या, असंच या थर्टी फर्स्टनिमित्त सांगावसं वाटते.