नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्हयात हाहाःकार उडाला होता. रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नव्हती, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी दहा रुग्णवाहिकेची भर पडलीय. नवीन रुग्णवाहिका जिल्हा विकास निधी तसेच खनिज विकास निधी अंतर्गत देण्यात आल्याय.
नागपूर जिल्ह्यात 25 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतल्याने तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेअगोदर नागपुरात लसीकरणावर अधिक भर देण्यात येईल, असे प्रयत्न प्रशासन करत आहे.
कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपूर शहरात पहिल्यांदा आज कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी यामुळे हुरळून जाऊ नये. कोरोनाला पळविण्यासाठी पात्र नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
राज्यात 6 ऑगस्टपर्यंत 4.63 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आलीय. यात राज्यातील 12 जिल्ह्यांतील दहा लाखांवर नागरिकांनी लस घेतली असून, सर्वाधिक लस घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. आरोग्य विभागाचा अहवालातून ही माहिती समोर आलीय.
नागपूर शहरात आज एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही, ही नागपूरसाठी चांगली बातमी आहे. यासाठी डॉक्टर व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. त्याप्रमाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. परंतु कोरोनाचे संकट टळलेले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क व सुरक्षित राखण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ हा सणासुदीचा आहे. त्यामुळे प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
(nagpur Administration ready To Prevent Corona third Wave)
हे ही वाचा :