उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नागपुरात होती. तसंच महायुतीची बैठकही नागपुरात झाली. या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. मात्र त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असणाऱ्या रेशीमबागेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी संघाच्या रेशीमबागेत जाणं अजित पवार यांनी टाळलं. महायुतीच्या बैठकीनंतर ते थेट पक्षाच्या कार्यक्रमात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीम बागेत जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पण यावेळी अजित पवार तिथे गेले नाहीत. महायुतीच्या बैठकीनंतर अजित पवार थेट राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गेले. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
मागच्या दोन दिवसांपासून अजित पवार नागपूर दौऱ्यावर होते. या दोन दिवसात अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर आणि जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? याचा आढावा अजित पवारांनी घेतला. तसंच जनसन्मान रॅलीपण यावेळी काढण्यात आली. नागपूरकरांशी अजित पवारांनी संवाद साधला. लाडक्या बहिणींकडून राखी देखील यावेळी अजित पवार यांना बांधण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झाली. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. जवळपास 4 तास 30 मिनिटे ही बैठक झाली. यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ आणि महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भाने चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
नागपूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत पोहोचले. तिथे त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी जी घटना घडली त्यामुळे नाचक्की झाली. मी सर्वांची माफी मागतो. हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकत होते. म्हणून आज देखील महाराजांच्या पुतळा बघितला, महाराजांचा फोटो बघितला की प्रेरणा मिळते. आज मी ज्यावेळेस माफी मागितल्या नंतर देशाचे पंतप्रधान पालघर त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली होती. पण काही लोक सध्या राजकारण करत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.