नागपूर : शासकीय शिबिर मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या प्रभाग 35 मध्ये घेण्यात आले. परंतु, ज्यांच्या प्रभागात शिबिर घेण्यात आले. त्यांनाच निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळं भाजपचे नेते अविनाश ठाकरे हे नाराज झाले. त्यांना फेसबूकवर पोस्ट टाकत आपली नाराजी व्यक्त केली. हे शिबिर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांची श्यामनगर हनुमान सेवा समिती आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आले. त्यामुळं ठाकरे यांची नाराजी जोशी आणि भंडारी यांच्यावर असल्याचे दिसते.
महात्मा फुलेंचा संघर्ष हा कोणत्या व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध नव्हता तर प्रवृत्ती विरुद्ध होता. आजही समाजामध्ये अश्या प्रवृत्ती आहेत ज्यांना आमच्यासारख्या सर्वसामान्य बहुजनांनी मेहनतीने कमावलेले यश पचवता येत नाही. म्हणूनच मग कट कारस्थान करून आमच्या सारख्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गुलामी स्वीकारली नाही म्हणून स्वाभिमानाला ठेच पोहचवून प्रताडीत करण्याचं षडयंत्र रचल्या जात आहे. अशा प्रवृत्तींच्या विरुद्ध आमचा संघर्ष मरेपर्यंत सुरूच राहील, अशी पोस्ट मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केली आहे.
अविनाश ठाकरे यांनी पक्षावर नाराज नसल्याचं सांगितलं असलं, तरी त्यांची पोस्ट बरेच काही सांगून जाते. आगामी मनपा निवडणूक लक्षात घेता भाजपात अंतर्गत कलह सुप्त असल्याचं दिसतं. कारण उघड बोलून वातावरण तापविने काही नेत्यांना योग्य वाटत नाही. तर, पक्षात सारे काही ठीक आहे. ओबीसींवर पक्षात काही अन्याय होत नसल्याचं भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांचं म्हणण आहे.