विधानसभा निवडणूक होत आहे. अशात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्ण बहुमताने महाराष्ट्रात महायुतीचा सरकार येत आहे आणि प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रात मिळणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. आमचा जाहीरनामा पसंत पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. 165 च्या वर आमच्या जागा येणार आहेत, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अपक्ष आमच्या संपर्कात आज नाहीत. मात्र सरकार आल्यावर अपक्ष सरकार सोबत उभे राहतात, असंही त्यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी कालच्या सभेत बोलताना कुणाचाही नाद करा. पण माझा नाद करू नका, असं म्हटलं. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या नादी कोण लागलंय? त्यांच्या नादी त्यांचे लोक लागले आहेत. आमच्याकडे मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारकडे एवढं काम आहे की आमच्या कामामुळे लोक आम्हाला मतं देतात. शरद पवारांकडे नादी लागायचं आम्हाला काम नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची जाहिरात खरी आहे. मविआची जाहिरात खोटी आहे, आपसातल्या वादामुळे महाविकास आघाडी लोकसभेचा जो परफॉर्मन्स होता तो होणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून लोकसभेत मत घेतली. चार महिन्यात जनतेने काँग्रेसला सोडलं. हरियाणा काँग्रेसला नाकारलं आहे. महाराष्ट्रातही जनता काँग्रेससाठी तयार नाही. मला विश्वास आहे पूर्ण बहुमताने महायुतीचा सरकार येणार आहे, असं बावनकुळे म्हणालेत.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या रोड शोमध्ये काल राडा झाला. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या प्रकाराबद्दल मला फार माहिती नाही. पण मला असं वाटतं की लोकांमध्ये भावना आहे की ते भाजप कार्यकर्ते वगैरे काही नाही. राहुल गांधी आरक्षणाबाबत जे प्रदेशात बोलले. त्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल चीड आहे. म्हणून जनतेच्या मनात आक्रोश आहे, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.