सुनील ढगे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 19 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. अशात ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनीही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला भुजबळांचा विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्याला भुजबळांचा विरोध आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरूद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सुरु आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांना नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर बातचित केली. तेव्हा त्यांनी सरकारला एक पर्याय सुचवला आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना छगन भुजबळ यांनी जातीय जनगणना करण्यावर जोर दिला आहे. तशी मागणी भुजबळांनी सरकारकडे केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, राज्यात 6 कोटी लोक मराठा आहेत. मग माझं म्हणणं आहे की, जातीय जनगणना करा. मग स्पष्ट होईल की कोणत्या समाजाचे किती लोक राज्यात आहेत, असं छगन भुजबळ म्हणालेत.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री भेटलो. त्यात यावर काही बोललो नाही. कॅबिनेट समोर अहवाल आला तर त्यावर चर्चा करेल. मनोज जरांगे यांच्या सूचना, मागण्या एक एक वाढत चालल्या आहेत. आधी मराठवाड्यासाठी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली. आता महाराष्ट्रसाठी मागणी करत आहेत. आईच्या सर्टिफिकेट ची मागणी मान्य केली तर एससी एसटी आरक्षण मध्ये कुठला फॉर्म्याला लावायचा हा प्रश्न येईल. त्याचा अभ्यास करावा लागेल, असं भुजबळांनी म्हटलंय.
10 खुर्च्या असताना 25 लोक आले तर कुणालाच जागा मिळणार नाही. ओबीसीमध्ये कुणबी म्हणून मराठा मागच्या दाराने आले तर मूळ ओबीसी ला काहीच मिळणार नाही. राजकीय फायदा मिळणार नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिले तर शैक्षणिक, राजकीय आरक्षण त्यांना लागू होईल. ओबीसी मुद्द्यावर माझ्या पक्षातील नाही तर इतर पक्षातील लोकही बोलत नाही. ज्यांचे घर जाळली ते देखील बाजू मांडत नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.