सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 03 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशाच इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच राज्यात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते. तशी बोलणी सुरु आहेत. पण वंचित महाविकास आघाडीत येणार का? त्यांची चर्चा कुठपर्यंत आली आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. आमची चर्चा झाली आहे. दोन दिवसात तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील. पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटलेला दिसेल. असं मला वाटतं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केलं हे लपून राहिले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षण दिलंय. अशी मराठा समाजाची समज झाली आहे किंवा त्यांना कळून चुकलं आहे. तोच रोष समाजाचा सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे. मतदारावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेऊन असे उद्योग यापूर्वी या सरकारने केले आहेत, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केलाय.
आमची मराठा समाजाला विनंती आहे की, असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय. त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं. उमेदवार उभे करणे मनातील राग काढण्यासाठी लोकशाही साठी करणे योग्य राहणार नाही असं मला वाटतं, असं वडेट्टीवार म्हणाले.
भाजपच्या युवा मेळाव्यावरही वडेट्टीवार यांनी टीका केलीय. लोकांना वेटीस धरून खाजगी गाड्या किरायाने करून मेळावा केला. तर कार्यकर्त्यांना बळ देणार असतो की लोकांना वेटीस धरणारा असतो? याचा मतदानातून कळेल. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. एवढा निवडणूकीच बळ त्यांच्याकडे आहे की लाख नाही दोन लाख आणू शकतील. जेवढ्या गाड्या लावतील तेवढे लोक जास्त येतील. पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले ते काही पक्षाबरोबर उभे राहतात. असा आमचा अनुभव नाही आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत.