सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी नागपूर | 02 जानेवारी 2024 : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये लेडी गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. या महिला आधी सोन्याच्या दुकानात काम करायच्या. तिथले काही दागिने गायब असल्याचं सोन्याच्या दुकानाच्या मालकाच्या लक्षात आलं. त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचं मनात पक्कं केलं. काही लोकांची चौकशी केली. पुरावे तपासले. त्यानंतर पोलिसांना दागिन्यांच्या चोरीचा खरा सूत्रधार सापडला. पोलिसांनी याच दुकानात काम करणाऱ्या चार महिलांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली अन् सत्य सगळ्यांसमोर आलं. सोन्याचे दागिने चोरणाऱ्या या गँगची ही कहाणी काय आहे? वाचा सविस्तर…
नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिमूरकर ज्वेलर्स नावाचा दुकान आहे. या दुकानात अनेकजण काम करतात. मात्र त्या दुकानातून सोने आणि चांदी हळूहळू चोरी व्हायला सुरुवात झाली. प्रकरण मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी तपास करत तिथे काम करणाऱ्या जयेश सोनकुसरे नावाच्या कर्मचाऱ्याला अटक केली. हा तपास पुढे नेत असताना आणि त्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली गेली. त्याने त्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या सहा महिलांसुद्धा यात समावेश असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी आपले तपासाची चक्र फिरवली. सहा महिलांवर गुन्हा दाखल केला. तर त्यातील चार महिलांना अटक केली यांची कसून तपासणी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यांच्याकडून एक किलो 450 ग्रॅम सोन आणि साडेदहा किलो चांदी जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणात आणखी कोण कोण गुंतलेला आहे आणि हा सगळा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ज्वेलर्सच्या दुकानात काम करत दुकानातील 1 हजार 450 ग्रॅम सोन्या सह साडेदहा किलो चांदी ची चोरी करणाऱ्या लेडी गॅंगला नागपूरच्या तहसील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. चार महिलांना अटक करण्यात आली पोलिसांनी 1 हजार 450 ग्राम सोन आणि साडे दहा किलो चांदी असा एकूण 94 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.