नागपूर | 04 ऑक्टोबर 2023, गजानन उमाटे : नांदेडमधील सरकारी रूग्णालयातील मृत्यू प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही सरकारी रूग्णालयात रूग्णांच्या मृत्यूबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल रूग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मेयो रूग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रूग्णालयातून अत्यावस्थ या ठिकाणी येतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं रूग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतापले आहेत. राज्यात एका पाठोपाठ एका शहरात रूग्णाच्या मृत्यूंची समोर येणारी आकडेवारी ही धक्कादायक आहे. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. सरकारने या मृत्यूंची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये नागपूरच्या शहर आणि ग्रामिण भागातून तसंच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातूनही इथे रुग्ण येत असतात. पण मागच्या वर्षभराची सरासरी जर पाहिली तर मृत्यूंची संख्या हीच आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढली नसल्याचा दावा रूग्णालयाकडून करण्यात येत आहे. मात्र आपल्या जवळची माणसं गमावल्याने यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे या मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल याच रुग्णालयात 7 मृत्यूंची नोंद झाली. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
नांदेडमधील रुग्णांच्या मृ्त्यूप्रकरण ताजं असतानाच काल छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश होता. बाहेरील रुग्णालयातून घाटीत रेफर केलेल्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या या रूग्णांना या सरकारी रूग्णालयात पाठवलं जातं. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे.