नागपूर : महापालिका निवडणुकीत 52 प्रभाग आहेत. 156 जागांमधील अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव असतील. यात सर्व प्रभागांच्या सर्वसाधारण महिलांना एक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरीही त्यांच्या 26 जागा शिल्लक राहतील. या जागा पुन्हा समाविष्ट करावयाच्या आहेत. त्यामुळं 52 पैकी 26 प्रभागामध्ये एक पुरुष, तर दोन महिला अशी रचना करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव सहा जानेवारीला निवडणूक आयोगाकडं जाणार आहे. तसेच आरक्षण निश्चितीसाठी प्रभागवार जातिनिहाय लोकसंख्येची माहिती सादर करावयाची आहे. निवडणूक आयोगानं नोव्हेंबरमध्ये प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मनपाने कच्चे प्रारूप तयार करून आयोगासमोर सादरीकरण केले. नागपूर मनपा आगामी निवडणुकीत 52 प्रभागांचे राहील. तर 156 नगरसेवक निवडूण येतील.
नागपूर महापालिकेची ही त्रीस्तरीय प्रभाग रचना आहे. असे शासनाने आधीच सुचित केले. यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचे वाटप करण्याची पद्धत दिली आहे. सध्यस्थितीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी कोणत्याही जागा देण्यात येणार नसल्याचे आयोगानं सूचित केले आहे.
निवडणूक आयोगानं प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीसाठी सुधारित आदेश दिले. या सर्व प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोडत काढण्याच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा संपूर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. आयोगाच्या मान्यतेनंतर प्रभागनिहाय हद्द निश्चित होईल, असे सांगण्यात येते.