गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच युतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या प्रहारने लोकसभेसाठी काही जागांवर दावा केला आहे. यात अमरावती या लोकसभा मतदार संघावर प्रहारने दावा केला आहे. अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत, असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत. अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू. नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.महायुतीच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही, असं ते म्हणाले.
लोकसभेपाठोपाठच विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रात होणार आहे. विधानसभेला किती जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विधानसभेच्या 15 जागा आम्हाला लढवायच्या आहेत. 15 तारखेनंतर मिटिंग घेऊन भुमिका मांडू. जिथे आमचा उमेदवार खंबीर असेल. चांगला उमेदवार तिथे आम्ही लढू, असं बच्चू कडू म्हणाले. मी श्रीरामाचं दर्शन करुन आलोय. पुन्हा वाटलं तर पुन्हा दर्शनाला जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त पॅकेज नको, कायम उपाय हवा. शेतीबाबत अनिश्चित धोरणामुळे शेतकरी आत्महत्या आहेत. तरुणांच्या आत्महत्या वाढल्याआहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. यासाठी सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखं आहे. चपराशाला, हॅाटेल मध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. याला सरकार जबाबदार आहे, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.