गजाजन उमाटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 डिसेंबर 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अशात विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. गळ्यात संत्र्यांची माळ घालत आणि हातात निषेधाचे बॅनर्स घेत विरोधी पक्षातील नेते विधीमंडळ परिसरात पोहोचले. विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेते जमले आणि त्यांनी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. खोके सरकार हाय हाय!, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिंदे सरकारचा निषेध विरोधी पक्षांनी यावेळी केला. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे सरकारचा निषेध करण्यात आला.
नागपुरात विधीमंडळ परिसरात विरोधकांनी सरकराच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार 420!, बळीराजा अवकाळीने ग्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, खोके सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
विधीमंडळ परिसरात विरोधकांकडून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नाही. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. मदत देत नाही. कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी सूडा पोटी केली जात आहे. ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं सुनील प्रभू म्हणाले.