सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर पोलीस वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. गुन्हेगारी कशी कमी केली जाईल. यासाठी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा भर असतो. असाच एक उपक्रम त्यांनी आज राबवला. हा उपक्रम अनोखा असल्याने याचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे उपक्रम राबवून समाजाचे आरोग्य चांगले करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नागपूर पोलिसांनी व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा पुनर्जन्म वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम केला. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं. मैत्री व्यसनमुक्ती संस्था आणि पोलीस यांच्यातर्फे हे आयोजन करण्यात आलं.
व्यसनमुक्त झालेल्या 30 व्यक्तींचा या ठिकाणी पुनर्जन्म वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सोबतच त्यांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी करण्यात आला. ड्रग्स फ्री नागपूर या अभियाना अंतर्गत हे आयोजन करण्यात आलं.
यामध्ये ज्या लोकांनी ड्रग्स किंवा अमली पदार्थ सेवनावर मात केली अशा 30 लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर या लोकांचे अनुभवसुद्धा या ठिकाणी मांडण्यात आले. व्यसनामुळे आयुष्य कसं बरबाद होऊ शकते हे सुद्धा सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला व्यसनमुक्ती संस्था आणि पोलीस मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जे व्यसनमुक्त झाले त्यांना समाजाला व्यसनमुक्त करण्याचा त्यासाठी काम करण्याच आवाहन केलं.
एकदा दारू पिण्याची लत लागली तर ती सुटणे तसे कठीण. पण, काही लोकं मनावर ताबा मिळवतात. व्यसनमुक्त होतात. अशा लोकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. व्यसनमुक्त झालेल्यांना अनुभव कथन केले. आधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यातील फरक समजावून सांगितला. यातून व्यसनमुक्त झाल्यानंतर त्यांच्या जीवनात काय परिवर्तन झाले, हे समजू शकले.