नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सहा बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं (National Children’s Award) सन्मानित करण्यात आलं. पदक एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्रातील सहा बालकांमध्ये नागपूरच्या श्रीनभ अग्रवालचा (Srinabha Agrawal) राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. नवसंशोधनाचा पुरस्कार श्रीनभला झाडावर येणारा येलो मोझॅक नष्ट करण्यासाठी बनविलेल्या नैसर्गिक सोल्युशनसाठी (Natural Solutions) दिला आहे. पंतप्रधानांनी सन्मानित केल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीनभनं दिली आहे. देशासाठी नोबल मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील, असं श्रीनभ यावेळी म्हणाला.
क्रीडा, शौर्य आणि नवसंशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. श्रीनभला हा पुरस्कार संशोधनासाठी मिळाला. त्याने झाडावर येणारा यलो मोझॅक व्हायरस नष्ट करण्यासाठी एक नैसर्गिक सोल्युशन बनविले. त्यासाठी २०२१ चा राष्ट्रीय बाल पुरस्कार नवाचार गटात देण्यात आला. श्रीनभ लहानपणापासूनच मेहनती आहे. तो दररोज अठरा तासांच्या कामाचे नियोजन करतो.
नागपुरातील श्रीनभ मौजेश अग्रवाल यांना किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभुतपूर्व कामगिरीबद्दल सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी श्रीनभ मौजेश अग्रवालच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाच्या आरोग्य समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी यांच्यासह श्रीनभ अग्रवालच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यावर्षी कोरोना काळात एकाच वेळी सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. श्रीनभला सन 2020-21 साठी हा पुरस्कार मिळाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून श्रीनभला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.