गजानन उमाटे,नागपूरः कुडकुडणाऱ्या थंडीत (Cold) वाफाळता चहा घेण्याचं सुख अनेकांना हवं हवं वाटतं. सध्या हिवाळा (Winter) सुरु आहे, त्यामुळे गरमा-गरम अद्रकचाच चहा हवा, असा अट्टहासही अनेकांचा असतो. कामानिमित्त बाहेर निघणाऱ्यांनाही आता जागोजागी विविध ब्रँडचे चहाचे स्टॉल (Tea Stall) सेवा देत असतात.
आरोग्यासाठी धोकादायक आहे, डॉक्टरांकडून वारंवार सांगूनही हा मोह न आवरता येणारे आपल्याही आजूबाजूला अनेकजण असतात. पण नागपुरात आता गरमागरम चहाला खणखणीत पर्याय उलबद्ध करून दिलाय, एका तरुणीने. सुपवाली इंजिनिअर म्हणून तिला चांगलीच लोकप्रियता मिळतेय.
केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या या तरुणीने नुकतंच नवं स्टार्टअप सुरु केलंय. तिच्या स्टॉलवर ती 30 प्रकारचे सूप तयार करून देते. थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला मिळत असल्याने तिच्याकडे येणारे ग्राहक कामाची पोचपावती दिल्याशिवाय जात नाहीत.
सोमम गोतमारे असं या तरुणीचं नाव आहे. सोनमने केमीकल इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता सूप विक्रीचं स्टार्टअप सुरु केलंय. सोनम नागपूरातील रस्त्यांवर, फुटपाथवर आपला स्टॅाल लावते आणि 30 वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थी सुपची विक्री करते.
इंजिनिअर मुलगी, डोळ्यांसमोर एक धेय्य घेऊन रस्त्यावर 30 प्रकारच्या ‘नॅचरल सुप’ ची विक्री करते. त्यामुळे तिने तयार केलेल्या हेल्दी सुपला ग्राहकांचीही चांगली पसंती मिळतेय…
विशेष म्हणजे सोनमने तयार केलेल्या या सूपमध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिम रसायनं वापरलेली नसतात. या सर्व प्रकारच्या भारतीय फ्लेवर्सचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारची प्रिझर्व्हेटिव्हदेखील यात वापरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे जास्त फायद्याचे आहेत, असा दावा सोनमने केलाय.
काही वर्षांपूर्वी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना टपरीवर चहाचा पर्याय उपलब्ध होता. पण मागच्या पाचेक वर्षात ठिकठिकाणी ब्रँडेड चहाचे शॉप सुरु झालेत. बदलत्या शहरीकरणात रस्त्यावरच्या चहालाही उत्तम मार्केटिंग व्हॅल्यू निर्माण झालंय.
याच मार्केटमध्ये नागपूरच्या सोनमने आता सूपचा नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. आरोग्यासाठी पोषक आणि नवी चव असल्याने हा सूपचा पर्याय अधिक लोकप्रियता मिळवून देणारा ठरू शकतो.