नागपूर – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंनी भोंगे तातडीने बंद करण्याचे सरकारला आदेश दिल्यापासून राज्यातलं वातावरण अत्यंत गरम आहे. नागपूर पोलिसांद्वारे (Nagpur Police) आता भोंग्यांबाबत नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लग्नसमारंभातील भोंग्यांवरही विघ्न येणार आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांसोबतचं लग्नसमांरभातील भोंगे आणि डिजेवरही यापुढे मर्यादा येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोंगे वाजवायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक केली आहे. विशेष म्हणजे त्याबाबत काल पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची बैठक घेतली आहे.
यापुढे नागपूरात विनापरवानगी कुठेही भोंगे वाजल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये लग्नसमारंभातील भोंगे किंवा डीजेवरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आता नागपूरात सगळ्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल नागपूर पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. विना परवानगी कुठेही भोंगे वाचवताना दिसल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल.
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात भोंग्याबाबत आपली भूमिका स्षष्ट केली. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत तापलं आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात एक जाहीर सभा घेतली. त्यावेळी सुध्दा त्यांनी आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा अल्टीमेटम दिला. पण औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना नोटिशी बजावल्या आहेत.