नागपूर: राज्य सरकारनं गेल्या आठवड्यामध्ये दुकानांच्या वेळा वाढवण्यास मंजुरी दिली. मात्र, उद्यापासून कोरोना लसीच्या दोन डोसची अट राज्य सरकारनं ठेवलीय. यामुळं इन्स्पेक्टर राज वाढेल, त्यामुळं ही अट शिथील करावी, अशी मागणी नागपुरातील सरकार जगाव वाणिज्य बचाव संघर्ष समितीने केलीय.
कोरोना लसीचा तुटवडा असल्याने सर्वांना दोन डोस घेणं शक्य नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दोन डोसची ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी असलेली अट शिथील करावी. उद्यापासून लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आलीय. तसंच संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणीही व्यापारी संघर्ष समितीचे प्रमुख दिपेन अग्रवाल यांनी केलीय.
सध्या कोरोना लसींचा तुटवडा आहे. लस उपलब्ध होत नसल्यानं आणि लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर पाहता दोन्ही डोस घेण्यासाठी तीन महिने लागू शकतात. त्यामुळे लसीकरणाची अट शिथील करत कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना परवानगी द्यावी, असं दिपेन अग्रवाल यांनी म्हटलंय. सरकार एका बाजूनं दुकानं उघडण्यास परवानगी देतेय मात्र, दुसऱ्याबाजूनं नियम करुन त्या निर्णयात अडथळे निर्माण करत आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलंय.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात दुकानं बंद असल्यानं छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं यंत्रणा तयार करुन व्यापाऱ्यांना पॅकेज द्यावं, असं दिपेन अग्रवाल म्हणाले. लॉकडाऊनमुळे छोटे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
दुकानं उघडण्याबाबतचा निर्णय उशिरा झाला आहे. दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव यांचं या निर्णयाबद्दल अभिनंदरन करतो, असं अग्रवाल म्हणाले.
विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.
विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर विदर्भात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
इतर बातम्या:
चांगली बातमी : लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार, ‘या’ महिन्यापर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध?
Nagpur corona : नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात शून्य मृत्यू
Nagpur Traders demanded govt should be cancel fully vaccinated norm due to lack of corona vaccine supply