रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात आहे. अशातच किरण सामंत यांनी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून माघार घेत असल्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर नारायण राणे ही जागा लढतील, या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. अखेर ती पोस्ट किरण सामंत यांनी मागे घेतली आहे. यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात बोलताना उदय सामंत यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा केला आहे.
भावनिक निर्णय होता. आमचं सगळं बोलणं झालं. आमचा दावा आहे. आम्ही ती जागा लढवणार आहोत. गैरसमज दूर झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं आहे. ही जागा आपणच लढलो पाहिजे, अशी कार्यकर्त्यांच्या भावना आहे. त्यामुळे आमचा दावा आहे. किरण सामंत यांनी ट्विट सुद्धा मागे घेतलं आहे, असं उदय सामंत म्हणालेत.
नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला आहे. अशात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. याववरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहे म्हणाल… तर मी सांगतो ठाकरे गटाचे राहिलेले आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देईल. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील तेव्हा नाव सांगेन, असं उदय सामंत म्हणालेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. आज दुपारी ३ वाजता होणार कुडाळला महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. यात लोकसभेच्या उमेदवारीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.