सुनील ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी- नागपूर | 01 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच जागावाटप, उमेदवारी आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार याची चर्चा होतेय. राज्यात महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडीचं? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल मात्र जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय. ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल सर्वाधिक जागा आम्ही जिंकू. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे. हे केवळ स्वप्न नाही. तर जनतेच्या आम्हाला प्रतिसाद आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
सरकारने कुठल्याही पोस्टवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन करावी. रश्मी शुक्लाची नियुक्ती होणार असं ऐकत आहे. त्यामुळे मी अधिक त्यावर सध्या भाष्य करणार नाही. न्यायालयाने क्लीन चिट दिल्याची माहिती सर्वत्र सांगितली जात आहे. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सरकारने टाळाव्यात. जरी त्यांना अधिकार असले तरी आरोप प्रत्यारोप असतील. तर ते टाळलेले बरं, असं माझं मत असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
डीपीडीसीच्या निधी वाटपावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुन्या कडीला नव्याने उत असा प्रकार सुरू आहे. एकीकडे सत्तेमध्ये राहायचं सत्ता उपभोगायची निधीवरून भांडण दाखवायचं. लोकांच्या प्रश्नांना बगल द्यायची पैशासाठी सत्तेत सहभागी झालेले आहेत. त्यामुळे दुसरा काय करणार?, असं वडेट्टीवार म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीत वाद होईल. हे मी अगोदरच बोललो आहे. तिन्ही पक्षाचे नेते आहेत. त्यांना अनेकांनाअनेक लोकांना कमळावर लढावं लागेल ज्या पद्धतीने वातावरण सरकार विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठी आहे पुढे वाढत जाईल. यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही. मोदी यांना लोकसभा जिंकून काढायची आहे. त्यानंतर खडाजंगी सुरू होईल, असं ते म्हणाले.