नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर शरद पवार आज दुपारी दाखल झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विमानतळावर वाजत-गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. विदर्भातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत विमानतळावर आले होते. शरद पवार हे आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
विशेष म्हणजे नागपुरात जमावबंदी असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अमरावतीतील हिंसाचार आणि गडचिरोलीतील नक्षली कारवाई या पार्श्वभूमीवर ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जमावबंदीचा आदेश झुगारून भाजपनं आंदोलन केले होते. त्यांच्याविरोधात धंतोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
नागपूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशात जिल्हातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अनिल देशमुख कारागृहात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या या दौऱ्याला महत्त्व आलं आहे. महापालिका निवडणुकीत उभे राहू इच्छिणाऱ्यांनी पवारांच्या स्वागतासाठी रांगा लावल्या होत्या.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत हा दौरा होत आहे.
अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. ते नसताना शरद पवार हे कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी हा दौरा करीत आहेत. अनिल देशमुख कारागृहात असताना शरद पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज विमानतळाबाहेर लावण्यात आले होते. विदर्भात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे चेहरा मानले जातात.
स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटो लावण्यात आले होते. राष्ट्रवादी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष शिवराज गुजर यांनीही पवार यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लावले होते. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे हे यावेळी पवार यांचे स्वागत करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते.
राम नेवले यांचे निधन, वेगळ्या विदर्भाचे शिलेदार गेले
चंद्रपुरात उभारले कृत्रिम फुफ्फूस, प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास होणार