नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या (Isasani) नाल्याला रात्री पूर आला. या पुरात आई व मुलगी वाहून गेली आहे. सुकवन राधेलाल मातरे (Sukvan Matre) आणि त्यांची सतरा वर्षीय मुलगी अंजली राधेलाल मातरे ( Anjani Matre) असे वाहून गेलेल्यांचे नावं आहेत. यापैकी सुकवन यांचा मृतदेह घराच्या काही अंतरावर आढळून आला आहे. त्यांची मुलगी अंजलीचा शोध घेतला जातो आहे. काल दिवसभर आणि रात्री नागपूरसह संपूर्ण जिल्हात दमदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे तर काहींना पूर आलेला आहे. शहरातील खोलगट भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. चंद्रपुरातही पावसाचे दोन बळी गेले आहेत. एका तीन वर्षीय मुलीचा नालीत पडून मृत्यू झाला. तर एक जण पुरात वाहून गेला.
हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. त्याच वेळी सुकवन आणि त्यांची मुलगी अंजली हे घराबाहेर पडले असता तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या असाव्यात असा कयास लावला जात आहे. आज सकाळी सुकवन राधेलाल मातरे यांचा मृतदेह घरापासून काही अंतर दूर पडलेला दिसून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच हिंगणा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. अंजलीला शोध घेतला जातो आहे, अशी माहिती सुकवनची शेजारी धुतपता यांनी दिली.
चंद्रपुरातही नदी-नाल्यांना पूर आलाय. जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची विश्रांती दिली. धानोरा ते गडचांदूर जाणारा रस्ता भोयगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे. कालच्या पावसाचे जिल्ह्यात 2 बळी गेलेत. सानू चुनारकर या 3 वर्षीय मुलीचा गोंडपिंपरी येथील विठ्ठलवाडा गावात घरासमोरील नालीत पाय घसरून मृत्यू झाला.
तर कोरपना तालुक्यातील नोकारी बुद्रुक येथे संजय कंडेलवार यांचा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू झाला. काल दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूरला चांगलेच झोडपले. हवामान खात्याने जिल्ह्याला पावसाच्या अति सतर्कतेचा 72 तासांचा रेड अलर्ट दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यापैकी पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील सखल भाग जलमय झालाय.