नागपूर : हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दिल्ली दौरा करत आहेत. नवी दिल्लीत हायकमांडसोबत नवीन विधानसभा अध्यक्ष आणि फेरबदल्यांवर चर्चा होणार असल्याचं कळतं. नाना पटोले हे दिल्लीला आज रवाना होणार आहेत. उद्यापासून हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहेत.
विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असं नाना पटोले यांनी सांगितलं. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आणि एच. के. पाटील यांच्यासोबत आज संध्याकाळी भेट घेणार आहेत. त्यानंतर शक्य झालं तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.
हायकमांडनं मला बोलावलं आहे. यासंदर्भातील चर्चा त्याठिकाणी होणार आहे. पेपर फुटीचं प्रकरण, ओबीसी आरक्षण या विषयांवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सी आरएसएस आणि जुन्या लोकांच्या होत्या. त्या लोकांनी मुद्दामहून हा सारा प्रकार केला. याचा राज्यातील तरुणांना त्रास झाला. त्यामुळं या प्रकरणात जो काही दोषी असेल, त्याच्यावर कारवाई व्हावी, ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मागचा झारीतला शुक्राचार्य कोण हे राज्यातील आणि देशातील जनतेला कळलं पाहिजे. विरोधी पक्षानं ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा आणली नाही. तरी काँग्रेस पक्ष ही चर्चा घडवून आणेल. आरक्षण कमी करण्याच्या मागचा जो काही उद्देश होता, ते सभागृहात स्पष्ट होईल. काँग्रेस या भूमिकेवर अग्रेसर राहणार आहे. अधिवेशनाचा कालावधी फार कमी आहे, अशावेळी या सर्व विषयांवर चर्चा होणार की, नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, आरक्षण हे कोणाच्या उपकारानं होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं हा अधिकार दिला आहे, असंही नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.
हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार?