नागपूर: राज्यात सत्ता संघर्ष सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे रविवार 7 ऑगस्ट रोजी एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्लीत ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने राज्यातील हे तिन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात झालेलं सत्तांतर आणि कोर्टात सुरू असलेला सत्ता संघर्ष आणि तसेच ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार या पार्श्वभूमीवरही हे तिन्ही नेते एकाच मंचावर येत असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्याशी पहिल्यांदाच भेट होणार आहे. दिल्लीतील या कार्यक्रमाला वीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या 7 ऑगस्ट रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, रामदास तडस, बाळूभाऊ धानोरकर, महादेव जानकर, हंसराज अहीर, जयदत्त क्षीरसागर, फिरोदस मिर्झा, संजय कुटे, आमदार परिणय फुके, अभिजीत वंजारी आदी नेत्यांसह सर्वपक्षीय नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, असं बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.
या अधिवेशनाला 15 ते 20 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून ओबीसींचं अधिवेशन प्रत्येक राज्यात घेतलं जात आहे. यापूर्वी नागपूर, दिल्ली आणि हैदराबादेतही अधिवेशन झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. जातीनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय आणि देशभरात ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मिळावं आदी मागण्या या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. तसेच राज्य सरकार आणि केंद्राकडेही काही मागण्या करण्यात येणार असल्याचं तायवाडे यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवार, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळेही या अधिवेशनाला महत्त्व आलं आहे.