नागपूर | 31 ऑगस्ट 2023 : पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलवादी अत्यंत सक्रिय झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत नक्षलवादी घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. नक्षलवाद्यांचं एक परिपत्रकच समोर आलं आहे. या परिपत्रकातून त्यांचा वर्षभराचा अजेंडा समोर आला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत काय करायचं यावर या पत्रकात मोठा भर दिला आहे. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी एकदोन नव्हे तर तब्बल 55 नक्षलवादी संघटनांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पुढील वर्षी निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा 27 पानांचा मेगा प्लान समोर आला आहे. यात वर्षभराचा अजेंडा देण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकातून राज्यातील पाच शहरांना मोठा धोका असल्याचं दिसून येत आहे. नक्षलवाद्यांचा स्लीपर सेलही अॅक्टिव्ह झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक रक्तरंजित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीपासून तेलंगणाच्या जंगलापर्यंतच्या 55 नक्षलवादी संघटनांवर पोलीस वॉच ठेवून आहेत.
या परिपत्रकात शहरी नक्षलवादाचा उल्लेख करण्यात आला आहे. शहरी नक्षलवाद्याच्या माध्यमातून बदनाम केलं जात असल्याचंही या नक्षलवाद्यांचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, निवडणुकीत कोणताही घातपात होऊ नये, नक्षलवाद्यांनी शहरी भागांपर्यंत पोहोचू नये, तसेच रडारवर असलेल्या पाच राज्यात कोणताही घातपात होऊ नये म्हणून पोलीस आणि राज्य राखीव दलाचे जवान सतर्क झाले आहेत. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठीची रणनीतीही ठरवली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नक्षल्यांचा वार्षिक कार्यक्रम असतो. त्यासाठी त्यांनी हा मेगा प्लान तयार केला आहे. त्यांच्या संघटनेपुढे हा कार्यक्रम ते ठेवत असतात. त्यांच्या पार्टीचा, आर्मीचा आणि त्यांच्या संयुक्त मोर्चाचा हा अजेंडा आहे. नक्षलवाद्यांच्या विविध संघटना आहे. त्यांचा मिळून युनायटेड फ्रंट तयार झाला आहे. या संघटना देशात विविध भागात कार्यकरत असतात. त्यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
सूरजकुंडला केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला अनेक राज्यांचे गृहमंत्री उपस्थित होते. त्यात सर्व राज्यांना समन्वयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 2024 पर्यंत नक्षलवाद्यांना माडमधून संपवण्याचा केंद्र सरकारने प्लान तयार केल्याचं नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्याला नक्षलवाद्यांनी कडाडून केला आहे. नक्षलवाद्यांचा हा अजेंडा त्याचाच एक भाग असल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.