नागपूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून तात्काळ मुक्त करा. राज्यातील जनता पेटली आहे. राज्यापालांना हटवलं नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या मोर्चातून दिला होता. त्यानंतर राज्यपालांना हटवण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. राज्यपालांना पदावर राहायचं नसेल तर त्यांना मुक्त करा, असं अजित पवार म्हणाले. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्ताने आले असता ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही राज्यपालांविरोधात हल्लाबोल महामोर्चा काढला होता. राज्यपालांना पदावरून हटवा आणि दुसऱ्या कुणाला तिथे बसवा अशी आमची मागणी होती. राज्यपालपदी कोणत्या व्यक्तीला बसवावं हा केंद्राचा अधिकार आहे. एकदा दोनदा चूक समजू शकतो. हे सातत्याने होत आहे. चुकून काही घडत नाही. अनेकजण हसत हसत विधाने करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
रामदासस्वामींचं उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला जातो ते न पटणारं आहे. महाराष्ट्र कधीही हे सहन करणार नाही. कोणीही राज्यकर्ते असले तरी सत्तेवर येण्यासाठी शिवाजी महाराजांचंच नाव घेतात. महाराजांचा चेहरा दाखवूनच आम्ही त्या मार्गाने जाणार असल्याचं सांगतात.
केंद्रात, राज्यात त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्रात असं वारंवार घडत आहे हे त्यांना वरिष्ठांना सांगायला काय होतं? राज्यपालांना थांबायचं नसेल तर त्यांना मुक्त करावं आणि दुसऱ्या कुणाची नेमणूक करावी, असं अजितदादा म्हणाले.
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे काही योग्य वाटत असेल तर करा. ज्या गोष्टीतून राज्याचं भलं होणार असेल त्याला विरोध करण्याचं कारण नाही. निर्णय घेताना त्याचा गैरवापर होऊ नये, असं सांगतानाच आम्ही विधेयक वाचून पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचं करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. हे अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावं ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. कालही मी त्याचा पुनरुच्चार केला होता. आजही मी तेच सांगतो, असं सांगतानाच विदर्भातील अनेक प्रश्न आहेत. दोन वर्ष कोरोना संकटामुळे नागपूरला अधिवेशन झालं नाही. त्यामुळे अधिवेशन अधिक काळ चाललं पाहिजे. येथील स्थानिकांच्या मनात गैरसमज होऊ नये म्हणून अधिवेश अधिक काळ चालावं, असं त्यांनी सांगितलं.